सन २०१२ मध्ये संभाजी ब्रिगेडने तथाकथित वाघ्या कुत्र्याचा पुतळा पाडल्यानंतर संजय सोनवणींनी जी भूमिका घेतली होती, तीच भूमिका त्यांनी आजही घेतली आहे. तेव्हा त्यांनी एक तथाकथित जर्मन पुरावा समोर ठेवला होता, जो आजही नाचवला जात आहे. आम्ही त्यावेळीही या दाव्याचे खंडन केले होते आणि सोनवणींना जाहीर आव्हान दिले होते की, त्यांनी सांगितलेल्या पुस्तकातील पुरावा दाखवावा. मात्र, त्यावेळीही ते कोणताही ठोस पुरावा देऊ शकले नाहीत.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात हास्यास्पद बाब म्हणजे सोनवणी ज्या पुराव्याचा उल्लेख करतात, तो प्रत्यक्षात जर्मनीचा नसून स्वित्झर्लंडमधील बेसल शहरातील नॅच्युरल सोसायटीच्या नावाने आहे. हे पुस्तक जर्मन भाषेत असल्याने सोनवणींची गफलत झाली असावी. मात्र, आजच्या माहितीच्या युगात इंटरनेटवर जगभरातील ग्रंथसंपदा सहज उपलब्ध आहे, याचा त्यांना विसर पडला असावा. सोनवणी ज्या ग्रंथसूचीचा उल्लेख करतात, ते पुस्तक नसून नॅच्युरल सायन्स सोसायटी, बेसल, स्वित्झर्लंड यांच्या सभांचे इतिवृत्त आहे. या सभांचे संपूर्ण खंड Internet Archive (https://archive.org) वर उपलब्ध आहेत. संबंधित दस्तऐवज या लिंकवर (https://archive.org/search…) पाहता येईल. मात्र, कोणत्याही खंडात शिवाजी किंवा वाघ्या या शब्दांचा उल्लेख नाही.
आता प्रश्न असा आहे की, विज्ञान अभ्यास करणाऱ्या संस्थेचा इतिहासाशी काय संबंध? वाघ्या कुत्र्यासंदर्भात कोणतेही समकालीन पुरावे उपलब्ध नाहीत, आणि हा कुत्रा जातीविद्वेषातूनच पुतळ्यासोबत स्थापित करण्यात आल्याचे अनेक सन्मान्य लेखकांनी आपल्या लेखांमध्ये स्पष्ट केले आहे. आजही राजकीय स्वार्थासाठी या अनैतिहासिक विषयाचा वापर केला जात आहे. वाघ्या कुत्र्या हा ब्राम्हणांनी महाराष्ट्राच्या मस्तकी मारला आहे आहे. यातून मराठा बहुजनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे.
या विषयात धनगर समाजाला ओढून ताणून आणणे ही संघाची खेळी आहे हे कोरटकर आणि सोलापुरे प्रकरणात मिठाची गुळणी धरून बसलेल्या संघाचा स्लीपर सेल मनोहर भिडेनी वाघ्या कुत्र्याबद्दल घेतलेल्या भूमिकेवरून लक्षात येते. या विषयावरील सर्वात महत्वाचे आणि सखोल अभ्यास करून प्रकाशित झालेलं पुस्तक हे धनगर समाजातीलच विद्वान प्रा. के. आर. गावडे यांनी लिहिलेले आहे. गावडे सर इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत आणि केवळ धनगरांचे नेते म्हणवणाऱ्या हाके व दोडतले यांनी घेतलेल्या इतिहासाशी अप्रामाणिक असणाऱ्या भूमिकांमुळे आज खेदाने त्यांच्या जातीचा उल्लेख करावा लागत आहे.
बहुजन समाजाने भावनिक न होता इतिहासाचे सत्य समजून घ्यावे आणि शांतपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा. अनैतिहासिक वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यासाठी पाठिंबा द्यावा, कारण यात केवळ छत्रपती शिवरायांचीच नव्हे, तर श्रीमंत तुकोजी होळकरांचीही बदनामी करण्याचे षडयंत्र आहे.